नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने काल (मंगळवारी) मध्यरात्री सुनावणी घेतली. जखमींना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी सुरक्षित रस्ता देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिल्ली पोलिसांना दिले आहेत. विशेष म्हणजे न्यायाधीश मुरलीधर यांनी घरीच विशेष सुनावणी घेतली.
मुस्तफाबाद येथील रुग्णालयातील रुग्णांना गुरु तेग बहादूर रुग्णालयात सुरक्षित नेण्यात यावे, अशी याचिका न्यायालयाकडे आली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले आहेत. मुस्तफाबाद येथील रुग्णालय लहान असून तेथे आवश्यक सोईसुविधा नसल्याने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचे आदेश देण्यात आले होते.
काल रात्री उशिरा दाखल केली होती याचिका
काल रात्री उशिरा याचिका दाखल करण्यात आल्यामुळे न्यायाधीश उपलब्ध नव्हते. त्यामुळे वरिष्ठ न्यायाधीश जी. एस. सिस्तानी यांनी न्यायाधीश मुरलीधर यांच्या घरी सुनावणी करण्याचे आदेश दिले होते.