केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या पत्रामुळे देशभरातील विद्यापीठांच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या अंतिम परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह विभागाने देशातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांच्या परीक्षा घेण्यासाठीची परवानगी दिली आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने कडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये कोरोणाची असलेली पार्श्वभूमी लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालय आपल्या स्वतंत्र मार्गदर्शक सूचना ही जारी करून संबंधित राज्यांना कळविणार असल्याचे आज केंद्रीय गृह विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांनी आपल्या राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावरील अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर अनेक खाजगी विद्यापीठाने आक्षेप घेत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन त्यांना निकाल देऊ शकतो, अशी तयारी दर्शवली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी यासंदर्भात यूजीसीने आपल्या जुन्या मार्गदर्शक सूचनांचा फेरविचार करावा असे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह विभागाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून देशभरातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.