नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेडच्या वेळी काही प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व गुप्तचर संस्थांना शेतकरी नेत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्त सचिदानंद श्रीवास्तव, गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार आणि केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची आज एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमध्ये अमित शाहांनी दिल्लीतील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठीचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी हिंसाचारात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अहवाल मागवला आहे. यासोबतच आयुक्त श्रीवास्तव यांनी शाहांना दिवसभरातील सर्व घटनाक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की दिल्ली पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गावरुन न जाता, आंदोलकांनी कित्येक ठिकाणी बॅरिकेट्स तोडत दिल्लीत प्रवेश केला. या सर्वांना पकडण्यासाठी दिल्ली पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत आहे.
या बैठकीमध्ये अमित शाहांनी हिंसाचार करणाऱ्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले. दिल्ली पोलिसांनी या हिंसाचारासंदर्भात आतापर्यंत २२ एफआयआर गुन्हे दाखल केले आहेत. यांमध्ये दर्शन पाल, बलबीर सिंग राजेवाल, जोगिंदर सिंग आणि स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : हिंसाचाराच्या घटनेला गृहमंत्री अमित शाह जबाबदार, तात्काळ राजीनामा द्यावा