श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्यांत विरमरण आलेल्या जवानांच्या स्मरणार्थ लेथपोरा भागातील कँम्पमध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. आज या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
पुलवामा हल्ल्यांत प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा झालेल्या जवानांच्या नावासह त्यांची फोटो स्मारकामध्ये लावली आहेत. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे, सीआरपीएफचे विशेष महासंचालक जुल्फिकार हसन यांनी सांगितले.
दरम्यान स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये जवानांच्या कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. कारण, त्यांच्या घरीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही हसन यांनी सांगितले.
आजच्याच दिवशी १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामधला काळा दिवस आहे.