श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची जवळपास 8 महिन्यांनंतर नजरकैदैतून सुटका करण्यात आली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनुच्छेद 370वर भाष्य केले. 5 ऑगस्ट 2019 ला राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. तर, अनुच्छेद रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये बरेच बदल झाले आहेत. मीडिया, पत्रकार आणि लोकांनी एकत्र येऊन लढायला हवे, असे मुफ्ती पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
काश्मीरमध्ये ज्या परिस्थितीत पक्षातील सदस्यांनी काम केले, त्या लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. फेसबुकवर सक्रिय असलेल्या काश्मिरी मुलांना त्रास देण्यात आला. नजरकैदैत होते, तेव्हा पीडीपी रद्द झाल्यासारखे वाटले, असेही त्या म्हणाल्या.
काश्मीरमधील जनता नाऊमेद झाली आहे. म्हणूनच, मला लोकांना भेटणे आवश्यक वाटले. मला लोकांना संदेश द्यायचा आहे की, दरोडेखोर हा कितीही मोठा असला. तरी त्याला चोरलेला माल परत करावा लागतो. 5 ऑगस्ट 2019 ला राज्यघटनेच्या चिंधड्या उडवत अनुच्छेद 370 रद्द करण्यात आले. त्यापूर्वी काश्मीरमधील कोणत्याही नेत्याशी चर्चा करण्यता आली नाही. आपल्याला लुटलं गेलं आहे. आम्हाला दिलेली विशेष जागा हिसकावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. आम्हाला राज्यघटनेने हा अधिकार दिला आहे, असे मुफ्ती म्हणाल्या.
यापूर्वी 15 ऑक्टोबरला माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी असलेल्या सर्वपक्षीय बैठकीत भाग घेतला होता. काश्मीरला पुन्हा कलम 370चा दर्जा परत मिळावा, यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी मिळून 'पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' या पक्षांची स्थापन केली आहे.