रांची- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टर, परिचारिका जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. मात्र, त्यांना कोरोनापासून बचावासाठी वापरण्यात येणारे किट मिळत नाही. सध्या कोरोना बचाव किटचा तुटवडा आहे. त्यामुळे झारखंड येथील हजारीबाग येथील मेडीकल काॅलेजमध्ये डाॅक्टर चक्क रेनकोट घालून क्वारंटाईन कक्षात उपचार करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा- COVID-19 : इटलीकडून भारताने काय धडे घ्यावेत..?
कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने अनेक रुग्णालयांना कोरोना उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे डाॅक्टरच्या कोरोना किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारीबाग येथील मेडीकल काॅलेजच्या रुग्णालय प्रशासनाकडून डाॅक्टरांना क्वारंटाईन कक्षात उपचारा दरम्यान घालण्यासाठी रेनकोट देण्यात आला आहे. त्यामुळे या रेनकोट पासून डाॅक्टरांचे किती संरक्षण होते यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मात्र, ही परिस्थिती देशभरातील अनेक रुग्णांलयात दिसून येत आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.