नवी दिल्ली - राजस्थानातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याची चिन्हे आहेत. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. राजस्थानातील राजकीय परिस्थिती पाहता त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी चक्क बसप प्रमुख मायावती यांनी केली आहे.
'राजस्थानात जोरदार राजकीय हालचाली होत आहेत. अंतर्गत वाद लक्षात घेता संबंधित राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी. ज्यामुळे राज्यातील लोकशाही अबाधित राहिल', असे मायावती म्हणाल्या.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावरही मायावती यांनी जोरदार आरोप करत टीका केली आहे. गहलोत यांनी पक्षबदलाच्या कायद्याचे जाहीरपणे उल्लंघन केले. तसेच त्यांनी सलग दोनवेळा बसपसोबत धोका करून आमच्या पक्षातील आमदारांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घेतले, असा आरोप मायावती यांनी गहलोत यांच्यावर केला आहे. असंवैधानिकरित्या फोन टॅप करून आणखी एक घटनाविरोधी कृत्य गहलोत यांनी केले असल्याचेही मायावती म्हणाल्या.
दरम्यान, राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या आमदारांच्या घोडेबाजाराबाबत गुरुवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली. त्यांनतर काँग्रेसचे गटनेता महेश जोशी यांनी एसओजीकडे दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. महेश जोशींकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे एसओजी मुख्यालयात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल होताच एसओजीने तपास सुरू केला आहे.