नवी दिल्ली - मणिपूरमधील कांगपोकली जिल्ह्यामध्ये एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन सेंटरमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये जन्म झाल्यामुळे बाळाचे नाव इमॅन्युअल क्वारंटीनो असे ठेवले आहे.
31 मे ला सकाळी 9.45 मिनिटांनी महिलेने बाळाला जन्म दिला होता. क्वारंटीनोचे आई-वडील सैलुन्थांग खोंगसाई आणि नेंगनिहात खोंगसाई गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना परत गावी यावे लागले. गोवा येथून विशेष रेल्वेने ते 27 मेला गावी परतले होते. खबरदारी म्हणून त्यांना हैपी गावातील इमॅन्युएल शाळेमध्ये उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले.
त्यानंतर 30 मे ला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सुदैवाने त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे कांगपोकपी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. महिलेला प्रसव कळा सुरू झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने खबरदारी बाळगत, पीपीई पोषाख घालून त्यांची प्रसुती केली. बाळ आणि आई दोन्ही स्वस्थ असल्याचे डॉ. मिसाओ यांनी सांगतिले. दांम्पत्य आणि बाळाला कांगपोकलीमधील चोंगलाँग कम्युनिटी क्वारंटाईन सेंटरमध्ये पुढील विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करण्यासाठी पाठवले आहे.
क्वारंटाईन सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. थँग्मिनलून सिंगसन आणि महिलेची प्रसुती करणाऱ्या डॉ. नेंगपिल्हिंग मिसाओ यांनी बाळाचे नाव 'इमॅन्युअल क्वारंटीनो' असे ठेवले.
दरम्यान भारतात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलांना अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक महिलांची रेल्वे, बसेसमध्येच प्रसुती झाली आहे.