नवी दिल्ली - कोरोनाची लागण झाल्याच्या शक्यतेवरून विलगीकरणात ठेवलेल्या एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात रविवारी हा प्रकार घडला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ३७ वर्षीय व्यक्तीला ३१ मार्चला रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची शक्यता असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज या व्यक्तीने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून, त्याच्या पायाचे हाड मोडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील एका कामगारानेही राजस्थानच्या उदयपुरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विष्णू असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा : दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४४५; आणखी रुग्ण वाढण्याची भीती..