गांधीनगर - गुजरातच्या पालनपुरमध्ये एका ४८ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. या व्यक्तीला १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या कालावधीच्या शेवटच्या दिवशीच त्याने आत्महत्या केली आहे.
विनोदभाई पुरुषोत्तमभाई चौरसिया यांना २० मार्चपासून विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचा विलगीकरण कालावधी संपला होता. तसेच, त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला होता. मात्र कुटुंबामध्ये सतत होत असणाऱ्या कलहांमुळे आणि भांडणांमुळे त्रस्त होऊन या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मोर्बी जिल्ह्यात राहणारे चौरसिया यांचा वाहतूक व्यवसाय होता. त्यांचे कुटुंबीय पालनपुरमध्ये राहत होते. देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तेदेखील पालनपुरला कुटुंबासोबत राहण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहण्यास सांगितले गेले होते.
याठिकाणीच विलगीकरणाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी स्वतःला लटकावून घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : कोरोनाचा असाही फटका, लॉकडाऊनमुळे ' रेडलाईट एरिया ' ओस