चंदीगढ - लॉकडाऊनमुळे माणसांप्रमाणेच प्राण्यांचेदेखील हाल होत आहेत. गरजू आणि गरीबांना सरकार तसेच सामाजिक संस्था, संघटनांकडून जेवण उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र, प्राणी आणि पक्ष्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अशा कठीण काळातही काही असे लोक आहेत, जे स्वतःसाठी जेवण शोधत असतानाच पक्ष्यांनादेखील अन्न पुरवत आहेत.
असाच एक व्यक्ती चंदीगढमध्ये आहे, त्याच्याजवळ स्वतःसाठी जेवण नाही आणि घरी जाण्यासाठी पैसेही नाही. मात्र, तरीही तो मुक्या पक्ष्यांना धान्य आणि पाणी पुरवत आहे. या व्यक्तीने सांगितले की तो मिस्त्रीकाम करतो. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्याच्याजवळ काम नाही. त्याला प्रशासनाकडून जेवण मिळत आहे. मात्र, पक्षी उपाशीपोटी दाण्यासाठी भटकत असतात. त्यामुळे तो या पक्ष्यांसाठी खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करतो.
तो सांगतो की दिवसात दोनदा तो या पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो. त्याच्याजवळ पैसे नसल्याने दिवसातून केवळ एकदाच तो या पक्ष्यांना बाजरा टाकू शकतो. जवळ पैसे असताना त्याने बाजरा विकत आणून ठेवला होता. त्यातील रोज थोडा थोडा तो या पक्ष्यांना टाकतो.