मंगलुरू - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने लोकांच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली. यातच कर्नाटकमधील दक्षिण कन्नड येथील एका 56 वर्षीय कोरोना संशयिताने आत्महत्या केली आहे.
आत्महत्या केलेली व्यक्ती बंटवाल तालुक्यातील मेरमाजलु गावातील रहिवासी होती. ते स्थानिक पेट्रोलपंपवर कर्मचारी होते. कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्यानंतर आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनाही संसर्ग होऊ शकतो, या भीतीपोटी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, सरकारने कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 149 रुग्ण आढळून आले असून देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 873 झाली आहे. तसेच यामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.