कोलकाता - मोदींना मी पंतप्रधान मानत नाही. फनी चक्रीवादळामुळे झालेल्या हानीबद्दल मी आगामी पंतप्रधानांसोबत बोलेल, असा टोमणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मारला आहे. झगराम येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.
लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्याला येऊन ठेपली आहे. त्यावरुन राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. तर, विविध पक्षांचे दिग्गज एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना घेरले. त्यांनी चक्क मोदींना पतंप्रधान मानण्यापासूनच नकार दिला आहे.
काही दिवसांपूर्वी फनी चक्रीवादळाने देशामध्ये तांडव केला होता. त्याचा झपका पश्चिम बंगाललाही बसला आहे. पंतप्रधान मोदी यांचीही आज येथे सभा होती. दरम्यान पश्चिम बंगालला केंद्राची मतद देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपण ममता बॅनर्जी यांना फोन करून त्या बद्दल कळवले आहे, असेही त्यांनी म्हटले. मात्र, यानंतर ममता बॅनर्जी यांनी मोदींवर पलटवार केला.
निवडणुकांमध्ये फायदा लाटून घेण्यासाठी मोदी केंद्राची मदत देत आहेत. मात्र, आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज नाही, असे स्पष्टीकरणच ममता बॅनर्जी यांनी दिले. आम्ही आपल्या बळावरच झालेली हानी भरून काढू, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी मारला.