नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात दाखल केलेल्या तक्रारींचे परीक्षण केले नाही. काँग्रेसने वेळोवेळी आचारसंहिता व निवडणूक नियमनांचे पालन करण्यासंबंधी आयोगाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यावर आयोगाने कोणतीच भूमीका घेतली नाही, असा आरोप जेष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी भारतीय लष्कर, भारत-पाक संबंध यांचे राजकीय भांडवल केले. त्यांच्या सभांमध्ये त्यांनी अनेकदा विवादास्पद विधाने केली. त्यावेळीच त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय मतदान प्रक्रियेदरम्यान इव्हीएम मशिनमध्येही बिघाड असल्याच्या तक्रारी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. मात्र, आयोगाने डोळेझाक केली, असेही ते म्हणाले.