नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या सुरक्षा यंत्रणेत मोठी चुक समोर आली आहे. बुधवारी अमेठी येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यावर बंदुकीची लेझर लाईट ताणण्यात आली होती, असा दावा काँग्रेसने केला आहे. त्यावरून काँग्रेसने गृह मंत्रालयाला पत्र लिहून सूचना दिली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी मोठा रोडशोही केला होता. दरम्यान तब्बल ७ वेळा वेगवेगळ्या वेळी त्यांच्या डोक्यावर हिरवा लेझर किरण ताणण्यात आला, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसने गृहमंत्रालयाला त्याच्याशी संबंधित व्हिडिओही गृह मंत्रालयाला दिलेला आहे.
यापूर्वी देशाने दहशतवादी हल्ल्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना गमावले. या भयानक घटना प्रत्येक भारतीयांच्या मनात आत्ताही घर करून आहेत. अशात राहुल गांधी यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे काँग्रेसने आपल्या पत्रात नोंदवले आहे.
राहुल गांधी यांची सुरक्षा करण्याची प्रथम जबाबदारी सरकारची आहे. निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांच्याशी अशा प्रकारची घटना होणे धोक्याचे आहे. सरकारने या विरोधात तात्काळ कारवाई करावी. या घटनेसंबंधात योग्य तो तपास करुन लवकरात लवकर सुरक्षतेत वाढ करावी, असी मागणी त्या पत्रात केली आहे.