नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये हातावर पोट असलेल्या स्थलांतरित कामगारांचे हाल सुरु असून लॉकडाऊनमध्ये मिळेल त्या वाहनाने आपल्या घराकडे जात आहेत. ओडिशामधून महाराष्ट्रात काम करण्यासाठी आलेला एक 20 वर्षीय मुलगा आपल्या गावी सायकलने प्रवास करत पोहचला आहे. महेश जेना असे त्या मुलाचे नाव आहे.
महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय कामगार म्हणून काम करणाऱया महेश जेनाने महाराष्ट्रातील सांगली-मिरज ते ओडिशामधील जयपूरपर्यंतचा प्रवास सायकलने केला आहे. महेशने सायकल सायकल चालवत तब्बल 1 हजार 800 कि.मी अंतर पार केले आहे.
महेश सांगलीमधील एका कंपनीमध्ये काम करत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे कंपनी 5 महिन्यांकरिता बंद करण्यात आली. काम नसल्यामुळे सांगलीमध्ये राहणे त्याला कठीण होते. त्यामुळे सायकलने घरी जाण्याचा त्याने निर्णय घेतला. सायकलने प्रवास करत घरी जायला 10 ते 12 दिवस लागतील, असा विचार त्याने केला होता. मात्र, फक्त 8 दिवसांमध्ये तो जयपूरला पोहचला आहे. ओडिशा पोलिसांनी त्याला 14 दिवस विलगीकरणामध्ये राहण्यास सांगितले आहे. 14 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्याला घरी जाता येईल.