गोरखपूर - चौरी-चौरा हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. चौरी-चौरा हत्याकांडानंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे ही घटना केवळ देशातच नव्हे तर, संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली होती. यामुळेच गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या सत्याग्रहाचा आणखी एक पैलू जगासमोर आला.
महात्मा गांधीजांनी १९२० मध्ये इंग्रजांना देशातून हाकलून लावण्यासाठी असहकार आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनांतर्गत परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला होता. यात प्रामुख्याने परदेशी कपड्यांचा समावेश होता. या मार्गाने इंग्रजांविरोधात देशभरात असंतोष निर्माण करणे आणि देशवासियांचे संघटन करणे हा यामागील प्रमुख हेतू होता.
येथे स्मारकाच्या रूपात आहेत हुतात्म्यांच्या चिरंतन स्मृती
असहकार आंदोलन संपूर्ण देशात सुरू होते. गोरखपूरही यापासून दूर नव्हते. चौरी-चौरामध्ये कपड्यांचे मोठी बाजारपेठ होती. गांधीजींच्या सांगण्यावरून येथे लोकांनी एकत्र येऊन परदेशी कपड्यांविरोधात निदर्शने सुरू केली. परदेशी वस्तूंविरोधात आंदोलन सुरू केले. जसजसा विरोध वाढत होता, तसतशी पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. पोलिसांच्या तीव्र कारवाईमुळे क्रांतिकारकांचा राग अनावर झाला. काही क्रांतिकारकांनी पोलीस ठाण्याला आग लावली. यात २२ पोलिसांचा होरपळून मृत्यू झाला. अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने गांधीजी व्यथित झाले. त्यांनी ताबडतोब आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
५ फेब्रुवारी १९२२ ला घडला हा इतिहास
ज्या दिवशी क्रांतिकारकांनी पोलीस चौकीला आग लावली, ती तारीख होती, ५ फेब्रुवारी १९२२. इतिहासात हा दिवस चौरी-चौरा हत्याकांड या नावाने लिहिला गेला आहे. चौरी-चौरामध्ये जेथे ही घटना घडली, तेथे हुतात्म्यांचे स्मारक तयार करण्यात आले. येथील शीळेवर हुतात्म्यांचा इतिहास लिहिला आहे.