हैदराबाद - रामचंद्र गुहा म्हणतात, "महिलांच्या स्वातंत्र्य आणि उद्धारासाठी गांधीजींचे सर्वात मोठे योगदान म्हणजे, महिलांना सामाजिक आंदोलनांमध्ये सहभागी करून घेणे.”
रूचिरा गुप्ता या महिला कार्यकर्त्या म्हणतात, "ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल पाहण्यापुरते मर्यादित ठेवण्यात येत होते, त्या काळात गांधीजींनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी करून घेतले. आत्ताही जगात जवळपास सगळीकडे, आणि आपल्या देशातही, राजकारणामध्ये पुरुषांचाच मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. हेच लक्षात घेऊन, गांधीजींनी ब्रिटिशांविरूद्धच्या लढ्यामध्ये स्त्रीशक्तीचा वापर केला”. गांधीजींच्या आई पुतलीबाई आणि पत्नी कस्तुरबा या त्यांच्या अहिंसावादी चळवळीसाठी मोठ्या प्रेरणास्त्रोत होत्या. असहकार चळवळीदरम्यान त्या दोघींकडून बरेच काही शिकण्यास मिळाल्याचे बापूंनी बोलून दाखवले आहे. बापूंनी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना, आणि नंतर भारताच्या स्वतंत्र्यलढ्यामध्ये, अहिंसावादी चळवळीत मोठ्या प्रमाणात महिलांना सहभागी करुन घेतले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये बरेच बदल घडवले. जी काँग्रेस विविध गोष्टींबाबत आधी फक्त याचिका दाखल करण्यापुरती मर्यादित होती, त्याच काँग्रेसला त्यांनी जनआंदोलनाचे स्वरूप दिले. या दरम्यान त्यांनी महिलांना देखील प्रेरणा तसेच प्रोत्साहन देत या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी करुन घेतले.
महिलांच्या सामाजिक जीवनात झालेल्या प्रवेशामुळे दोन आमुलाग्र बदल घडले. एक म्हणजे, सामाजिक जीवनात महिला जास्त सक्रिय झाल्या. आणि दुसरा म्हणजे, महिला कार्यकर्त्यांसोबत काम केल्यामुळे पुरुषांची महिलांविषयीची मानसिकता बदलण्यास सुरुवात झाली. पुरुष कार्यकर्ते महिलांना समान वागणूक देणे आणि त्यांचा आदर करणे, अशा गोष्टी आपसूकच शिकू लागले.
दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करत असताना बापूंनी तिथल्या आंदोलनांमध्ये, आश्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी महिलांना प्रेरित केले. त्यावेळी तिथल्या सर्वात मोठ्या खाण कामगारांच्या आंदोलनामध्ये महिलांचाही मोठा सहभाग राहिला होता. भारतात, चंपारणमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी, एकूण २५ स्वयंसेवकांपैकी १२ स्वयंसेवक या महिला होत्या. चंपारणपासून सुरू झालेला आंदोलनाचा हा नवीन अध्याय पुढे मिठाचा सत्याग्रह, दलित मुक्ती चळवळ, चले जाव आंदोलन या सर्व आंदोलनांमध्ये अधिकाधिक प्रभावीपणे पाहायला मिळाला. १९१९ मधील अहमदाबाद कापड उद्योग कारखान्यातील कामगारांच्या संपाचे नेतृत्व गांधीजींनी स्वतः केले होते. तर, १९२१ च्या सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व अनसुया साराभाई यांनी केले होते. या चळवळीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. विदेशी कपड्यांची होळी असो किंवा स्वदेशी चळवळ, यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग राहिला आहे.
बापूंचे असे मत होते, की समाजात ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिला यांचा सहभाग असेल, तर कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकते. ते नेहमी म्हणत, की या 'अबला' जेव्हा 'सबला' होतील, तेव्हा त्या असहाय्य न राहता सशक्त होतील. चरख्यावर सूत विणणे, खादीचे कपडे बनवणे अशा सामाजिक चळवळींमध्ये महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. जर महिला चरखा विणतील, तर महिला देखील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात, असे गांधीजींचे मत होते.
१९२५ मध्ये, सरोजिनी नायडू यांना काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनवण्यात गांधीजींची मोलाची भूमिका होती. त्याकाळी, ब्रिटिश कामगार पक्ष, अमेरिकन लोकशाही पक्ष अशा जगातील मोठ्या पक्षांमध्ये देखील कोणा महिलेला अध्यक्षपद दिले गेले नव्हते. त्यामुळेच, सरोजिनी नायडू यांना अध्यक्षपद मिळणे ही खूप मोठी बाब होती. १९१९च्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर, गांधीजींनी महिलांना निवडणुकांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. १९३१ मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने, महिलांचे शिक्षण आणि हुद्दा यांचा विचार न करता, त्यांना समान हक्क मिळवून देणारा ठराव संमत केला. त्याकाळी, अगदी युरोपातील काही प्रगत देशांमध्ये देखील महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता.
गांधीजी स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक चळवळींना समान महत्व देत. त्यांनी १९३३ मध्ये हरिजन विकास यात्रा सुरू केली. या यात्रेचे मूळ उद्दिष्ट हे, अस्पृश्यांना समान सामाजिक हक्क मिळवून देणे होते. यामध्ये देखील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या राष्ट्रीय यात्रेत, अगदी आंध्रप्रदेशपर्यंतच्या महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी, या चळवळीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात आपल्या अंगावरचे दागिने दान केले होते.
दांडी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिलांपैकी बऱ्याच महिलांना अटक देखील करण्यात आली होती. साबरमतीमधून ३७ महिला स्वयंसेवकांसह दांडी यात्रेत सहभागी झालेल्या कस्तुरबा गांधींनी देखील मिठाचा सत्याग्रह केला. सरोजिनी नायडू, कमला देवी चट्टोपाध्याय आणि इतर महिलांनी बऱ्याच आंदोलनांचे नेतृत्व केले. खिलाफत असहकार चळवळीमध्ये मुस्लीम महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता. गांधीजींसोबत आंदोलनांमध्ये असताना मुस्लीम महिला 'पर्दा पद्धत' पाळत नसत. यामधूनच त्यांचा गांधीजींवरील विश्वास आणि श्रद्धा दिसून येते. १९४२च्या 'चले जाव' आंदोलनाच्या वेळी ब्रिटीश सरकारने महिलांना धक्के मारण्यास देखील मागे-पुढे नाही पाहिले. मात्र, तरीही महिलांनी आंदोलनातून माघार घेतली नाही. अरुणा असफ अली यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. उषा मेहता या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान गुप्त रेडिओ प्रक्षेपण करत.
केवळ आंदोलनांमध्येच नव्हे, तर कालांतराने महिलांना मंत्री पद, आणि गव्हर्नर पद देखील मिळू लागले. अगदी संविधानाच्या मसुदा समितीमध्ये देखील महिलांचा समावेश होता. यामधील राज कुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख ही काही विशेष नावे. आपल्या राज्यघटनेने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. जो त्याकाळी अनेक प्रगत देशांमध्येही नव्हता. गांधीजींपासून प्रेरणा घेऊन महिलांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभाग नोंदवलाच, मात्र त्यांपैकी बऱ्याच महिलांनी कारावास देखील भोगला. गांधीजींच्या प्रभावाने महिलांना नवशक्ती आणि प्रेरणा मिळाली. महिलांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे, पुरुषांमध्ये त्यांचा आदर वाढला. महिलांच्या समस्यांबद्दल, त्यांच्या हक्कांबद्दल जनजागृती झाली; आणि राष्ट्रीय चळवळ देखील वाढण्यास मदत झाली.
गांधीजी म्हणत, अस्पृश्यता आणि महिलांप्रती भेदभाव या दोन वाईट गोष्टींमुळे भारतातील सामाजिक जीवनावर दुष्परिणाम होत आहे. जर एखाद्या पुरुषाने शिक्षण घेतले, तर तो एकटा सुशिक्षित होतो. मात्र, एका स्त्रीने शिक्षण घेतल्यास एक कुटुंब आणि पर्यायाने एक समाज सुशिक्षित होतो. कोणत्याही प्रकारचे शोषण न होणारा समाज तेव्हाच अस्तित्वात येऊ शकतो, जेव्हा त्या समाजातील स्त्री ही सुशिक्षित असेल.
स्वातंत्र्य चळवळीमुळे धर्म, जात, लिंग यावर आधारित भेदभावाला तडा गेला. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सत्याग्रही हे दलित महिलांनी बनवलेले जेवण घेत. महात्मा गांधींमुळे समाजातील महिला उजेडात येण्यास मदत मिळाली आणि गांधीजींना सुद्धा आंदोलनकर्त्या महिलांकडून बरेच काही शिकण्यास मिळाले. ही गोष्ट त्यांनी स्वतः बऱ्याच वेळा कबूल केली आहे.
महिला गांधीजींचा विशेष आदर करीत. लोकांनी दिलेला सल्ला न मानता, गांधीजींनी एकदा आभा गांधी यांना त्यांचे दूत म्हणून नऊकाली जवळच्या एका गावात पाठवले होते. या गावात धार्मिक दंगल सुरू असल्याने लोकांची अशी मागणी होती की, गांधीजींनी आभा गांधींना तिथे पाठवू नये. स्वातंत्र्यानंतर झालेल्या दंगलींमध्ये अपहरण करण्यात आलेल्या एका मुलीच्या बचावासाठी मृदूला सारभा यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांनी जाहीररित्या हे सांगितले आहे, की यासाठीचे धाडस आणि प्रेरणा त्यांना गांधीजींकडूनच मिळाली. तसेच, अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे, कि रशिया आणि चीनमध्ये झालेल्या आंदोलनांमध्येही, गांधीजींच्या प्रेरणेमुळेच महिलांचा सहभाग वाढला.
मनू गांधी, गांधीजींच्या एक जवळच्या नातेवाईक, यांनी गांधीजींवर लिहिलेल्या पुस्तकाला 'बापूजी या माझ्या आई आहेत' असे शीर्षक दिले आहे. महिलांच्या सामाजिक उद्धारासाठी असलेले बापूंचे योगदान, यापेक्षा सोप्या आणि सुंदर शब्दांमध्ये मांडताच येणार नाही.