नवी दिल्ली - दिलेल्या मुदतीत शिवसेना सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरली आहे. मात्र, शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. अद्यापही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे सेनेचे कोंडी झाली आहे.
आज राज्यातील प्रमुख नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, यामध्ये नेमका काय निर्णय झाला याची माहिती अद्यापही मिळाली नाही.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले. मात्र, भाजपने पुरेसे पाठबळ नसल्याने, सत्ता स्थापनेचा दावा नाकारला. या सर्व घडामोडीनंतर काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या जनपथ निवासस्थानी तातडीने कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन पाठिंबा द्यायचा अथवा नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी दिली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला वरिष्ठ नेते अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासह कार्यकारिणी समिती सदस्य उपस्थित होते. सोनिया गांधी शिवसेनेची विचारश्रेणी पाहता पाठिंबा देण्यास इच्छुक नसल्याचे समजते. मात्र, भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे, इतर काँग्रेस नेत्यांनी बैठकीत सांगितले. यामुळे सोनिया गांधी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे समजते.
दरम्यान, राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेच्या पाठिंब्या अभावी भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिला. या सर्व घडोमोडीत आपले आमदार फुटू नये, यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले आहे. काँग्रेसला सुध्दा आमदार फुटण्याची भिती वाटू लागल्यामुळे काँग्रेस आपल्या आमदारांना जयपूरला हलवले आहे.