मुंबई - विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा मतदारांनी कौल भाजप- शिवसेने महायुतीच्या बाजूने दिलाय. तर मागच्या निवडणूकीपेक्षा अधिक आमदार जिंकण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालंय. गेल्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे आजवरचे सर्वात कमी आमदार निवडून आले होते. आत्ताची कामगिरी त्याहून सरस म्हणता येत नाही परंतु दुर्लक्षित करण्यासारखीही नाही.
महाराष्ट्रात १९६२ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला भारी भक्कम बहुमत मिळाले होते. तेव्हापासून ते १९९० च्या निवडणूकीपर्यंत ( आणिबाणीचा ७८ चा अपवाद वगळता ) स्वःबळाचे सरकार काँग्रेसने बनवले होते. १९९५ च्या निवडणूकीत भाजप- सेना युतीचे पहिल्यांदा सरकार आले. त्यावेळी काँग्रेसची मोठी पडझड झाली. याच काळात पक्षात फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १९९९ मध्ये स्थापन झाला. १९९९ च्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला ७५ जागा मिळाल्या तर नवीन स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५८ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मिळून सलग १५ वर्षे राज्य केले. २००४ मध्ये कांग्रेसला ६९ जागा आणि राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या. २००९ मध्ये काँग्रेला ८२ तर राष्ट्रवादीला ६२ जागा मिळाल्या. मात्र २०१४ च्या निवडणूकीत दोन्ही पक्षांची सर्वात निचांकी कामगिरी पाहायला मिळाली. १४ मध्ये काँग्रेसला ४१ तर राष्ट्रवादीला ४२ जागा मिळाल्या होत्या.
काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात सर्वाधिक काळ सत्तेवर राहणार पक्ष ठरलाय. या पक्षाला भक्कम विरोधक सुरुवातीच्या निवडणूकीपासूनच नव्हते. स्वातंत्र्यानंतर १९५२ च्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाला २८ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर विरोधकांची धार कुठेच काँग्रेसला जाणवली नाही.
शिवसेना हा आजच्या घडीला सत्तेत मोठा वाटा मागण्याच्या तयारीत आहे. २०१४ च्या निवडणूकीत पक्षाला ६३ जागा मिळाल्या होत्या. परंतु भाजपच्या जागा १२२ इतक्या जास्त आल्याने मुख्यमंत्री भाजपचा झाला. २०१९ मध्ये शिवसेनेच्या ५६ जागा आल्या असल्या तरी भाजपच्या जागा १०५ इतक्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे सत्तेचा मोठा वाटा मिळवण्यासाठी सेनेने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवलेले दिसते.
शिवसेनेची आजवरची विधानसभेतली कामगिरी दुर्लक्षित करण्यासारखी नाही. १९७० मध्ये मुंबईत कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. कृष्णा देसाईंचा खुन झाला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या वामनराव महाडिक यांनी विजय मिळवला आणि विधानसभेत सेनेचा पहिला आमदार पोहोचला. त्यानंतर झालेल्या १९७२ च्या निवडणूकीत वामनरावांचा पराभव झाला मात्र प्रमोद नवलकरांनी विजय मिळवला आणि विधानसभेतील शिवसेना आमदारांची १ ही संख्या कायम राखली. त्यानंतर पक्षाने अनेक चढ उतार पाहिले आणि १९९० च्या निवडणूकीत मोठी मुसंडी मारत शिवसेनेने ५२ आमदार विधानसभेत धाडले. १९९५ च्या निवडणूकीत पुन्हा कमाल झाली आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे मनोहर जोशी विराजमान झाले. शिवसेना- भाजपच्या युतीचे हे सरकार होते. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ६५ आमदार निवडूण आले होते. १९८० नंतर भाजपच्या प्रगतीचा आलेख वाढत गेलेला दिसतो. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच युती तुटली आणि सेना-भाजप स्वतंत्र लढले. याचा सर्वाधिक फायदा भाजपने उठवला. आजवरचे सर्वाधिक १२२ आमदार जिंकुन भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यंदाची निवडणूक मात्र महायुतीच्या वतीने दोन्ही पक्षांनी लढली आणि सत्ता मिळवण्याचा मार्ग सुकर केलाय. यावेळी भाजपचे १०५ आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत जिंकलेल्या सर्व पक्षांच्या आमदारांची संख्या खालील प्रमाणे आहे.
भारतीय जनता पक्ष - १०५
शिवसेना - ५६
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - ५४
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - ४४
अपक्ष - १३
बहुजन विकास आघाडी - ३
एमआयएम - २
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - १
शेतकरी कामगार पक्ष - १
जन सुराज्य शक्ती - १
क्रांतीकारी शेतकरी पक्ष - १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - १
प्रहार जनशक्ती पार्टी - २
राष्ट्रीय समाज पक्ष - १
समाजवादी पक्ष - २
स्वभिमानी पक्ष - १
एकूण - २८८