भोपाळ - मध्य प्रदेशातील गंजबासौदा येथील भाजप आमदार लीना जैन यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने या पत्रात भाजप आमदार लीना जैन आणि गृहमंत्री अमित शाह यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे.

गंजबासौदा येथील आमदार लीना जैन यांच्या घरी एक पत्र पाठवण्यात आले आहे. यात लीना जैन आणि गृहमंत्री अमित शाह यांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीसह गंजबासौदा रुग्णालय उडवण्याचीही धमकी देण्यात आली आहे. तसेच, गंजबासौदा पोलीस ठाणे आणि रेल्वे स्टेशनही बॉम्बने उडवण्यात येईल, असे म्हटले आहे.


लीना जैन यांच्या खासगी सचिवांनी या प्रकरणाची तक्रार गंजबासौदा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. शहरामध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच, संशयिताची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.