भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत एकूण ६४ विदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी काही नागरिक हे कोरोनावरील उपचारांसाठी दवाखान्यात दाखल आहेत. तसेच काहींनी दिल्लीमधील एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निझामुद्दीन मरकज कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांना इशारा दिला होता. २४ तासांच्या आत या सदस्यांनी स्वतः पुढे येत आपल्याबाबत माहिती न दिल्यास, त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते.
यानुसार पोलिसांनी कारवाई करत ६४ विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला. यासोबतच या नागरिकांना निवारा देणाऱ्या १३ जणांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक रजत सक्लेचा यांनी दिली. यांमध्ये म्यानमार, इंडोनेशिया, फ्रान्स, बेल्जियम आणि क्रिगीझ्स्तान या देशांमधील नागरिकांचा समावेश आहे. परदेशी नागरिक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असेही रजत यांनी सांगितले.
या नागरिकांना उपचारांनंतर मायदेशी परत पाठवण्यात येणार आहे. त्यांच्याकडून दंड वसूल केला जाऊन, सरकार त्यांना काळ्या यादीमध्येही टाकणार आहे.
हेही वाचा : COVID-19 : देशात एका दिवसातील सर्वाधिक नोंद; २४ तासांत वाढले हजारहून अधिक रुग्ण..