दौसा (राजस्थान) - जिल्ह्यातील महुआ उपखंड मुख्यालयाजवळील खंडेलवाल हॉटेलमध्ये थांबलेल्या एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार करणसिंह राठोड यांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचेही मृतदेह खाली उतरले. पुढे सरकारी रुग्णालयात मृतदेह पाठवल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, 10 जून रोजी आग्र्याहून एक जोडपे आले होते. खंडेलवाल हॉटेलमध्ये हे दोघे राहत होते. गुरुवारी सकाळी या दोघांनी नाष्टा केला त्यानंतर दुपारी जेवणही केले. पण, गुरुवारी संध्याकाळी त्यांनी खाण्यासाठी काहीच ऑर्डर न केल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना खोलीतील इंटरकॉमवर कॉल केला. मात्र, फोन स्वीकारला गेला नाही. त्यानंतर शुक्रवारी सकाळी नाश्त्याच्या वेळी पुन्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना कॉल केला. मात्र, तिकडून कोणतेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवून पाहिला तरीही आतून काही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर कर्मचार्यांनी हॉटेल मालकांना या घटनेची माहिती दिली.
हॉटेल मालक दीनदयाळ खंडेलवाल यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी येऊन तपास करत खिडकीतून वाकून पाहिले असता दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही आग्र्याचे रहिवाशी आहेत. यातील विकास कुमार यांचे लग्न झाले असून मुलगी मोनिका महावरचे लग्न झालेले नाही. त्यांचे नातेवाईक आल्यानंतरच शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.