हैदराबाद - देशातील सर्वांत लांब बोगद्याचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. हिमाचल प्रदेशमध्ये हा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याचे नाव रोहतांग बोगदा असे ठेवण्यात आले होते. रोहतांग पासच्या खाली धोरणात्मक बोगदा बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. त्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रोहतांग पास बोगद्याला वाजपेयींचे नाव दिले. अटल बोगद्यासारखीच काही रोमांचक बोगदे जगभरात आहेत. त्याविषयी आपण जाणून घेऊ या...
गोथार्ड बेस टनल - जगातील सर्वांत लांब बोगदा हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. 'गोथार्ड बेस टनल' असे या बोगद्याचे नाव असून हा इंजिनिअरिंगचे एक अप्रतिम उदाहरण आहे. या बोगद्यांची लांबी 57 किलोमीटर आहे.
सैकान बोगदा - सैकान बोगदा किंवा सैकान भुयार हे जपान देशाच्या होन्शू व होक्काइदो या दोन बेटांना जोडणारे एक समुद्राखालील रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. 53.85 किमी लांबीच्या या भुयाराचा 23.3 किमी लांबीचा पट्टा सुगारू सामुद्रधुनीखालून जातो. एकूण 538.4 अब्ज येन खर्च करून बांधल्या गेलेल्या व 13 मार्च 1988 रोजी खुल्या करण्यात आलेल्या ह्या बोगद्यामुळे जपानच्या ओमोरी प्रभागापासून होक्काइदो बेटापर्यंत थेट रेल्वे वाहतूक शक्य झाली आहे.
चॅनल टनेल - चॅनल टनेल 50.5 किमी लांबीचे रेल्वे भुयार आहे. हा बोगदा इंग्लंड आणि फ्रान्सला जोडतो. बोगद्याच्या एकूण लांबीपैकी 37.8 किमी अंतर पाण्याखाली आहे. 1994 साली बांधून पूर्ण झालेल्या ह्या बोगद्यामुळे लंडन व पॅरिस ही युरोपामधील दोन सर्वात मोठी शहरे द्रुतगती रेल्वेने जोडली गेली आहेत. युरोस्टार ही वाहतूक कंपनी लंडन ते पॅरिस व ब्रसेल्स दरम्यान जलद प्रवासी वाहतूक सेवा पुरवते.
लाएर्डल बोगदा - लाएर्डल बोगदा हा उत्तर नॉर्वेतील बोगदा आहे. याची लांबी 24.5 किलोमीटर आहे. या बोगद्याची रचना अत्यंत सुंदर आहे.
टोक्यो बे एक्वा - जपानमधील टोक्यो बे एक्वा बोगद्याचा 9.6 किलोमीटर भाग पाण्याखालून गेला आहे. तर, या बोगद्याचा 4.4 भागात ब्रिज आहे. त्यामुळे याचा बोगदा किंवा ब्रिज असा उल्लेख करण्याबाबत वाद आहे. हा बोगदा जपानमधील कावासाकी आणि किसाराजू या दोन शहरांना जोडतो.
चेनानी-नाशरी - हा बोगदा 9 किलो मीटर लांबीचा असून या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर प्रवासाचे दोन तास वाचतात. हा बोगदा बांधण्यासाठी 7 वर्षांचा कालावधी लागला. उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे सुरू होऊन हा बोगदा रामबन जिल्ह्यातील नाशरी येथे बाहेर पडतो. तब्बल 1 हजार 200 मीटर उंचीवर हा बोगदा आहे. या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकूण 1 हजार 500 अभियंते, भूगर्भतज्ज्ञ आणि कामगारांनी मेहनत घेतली आहे. तर, यासाठी एकूण 3 हजार 720 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. ‘चेनानी-नाशरी’ बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.