लंडन - पश्चिम लंडनमधील हॅव्लॉक रोडचे नाव बदलण्यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. या रस्त्याचे नाव गुरू नानक रोड, असे ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी याबाबत खुलासा करण्यात आला आहे. साऊथल येथे मोठ्या प्रमाणात शीख समुदायाचे वास्तव्य आहे. तर, हॅव्लॉक रोड हे श्री गुरुसिंह सभेचे निवासस्थान आहे. भारत वगळता हा जगभरातील सर्वात मोठा गुरुद्वारा समजला जातो.
लंडनचे महापौर सादिक खान यांच्यामार्फत या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जागतिक स्तरावरील सुरू असलेल्या ब्लॅक लाईव्हज मॅटरच्या निषेधांमुळे ब्रिटीश वसाहतवादाचे स्मारक असलेले पुतळे व सार्वजनिक जागांसह स्मारकांचे पुनर्मूल्यांकन केले जात आहे. यातच या प्रक्रियेचाही समावेश आहे.
याबद्दल बोलताना कौन्सिलर ज्युलियन बेल म्हणाले, महापौरांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यातून आज लंडन जसे आहे, तसे दाखवले जाऊ शकते. आमची विविधता हीच आमची ताकद आहे. आमच्या इमारतींची नावे, रस्त्यांची नावे, पुतळे यातून आमची विविधता झळकवण्यासाठी हे केले जात आहे. वसाहतवाद, वंशद्वेष आणि गुलामी व्यापार अस्तित्वात होता आणि तो साजरा केला गेला, अशा भूतकाळाचे प्रतिबिंब आम्हाला नको असल्याचे बेल यांनी स्पष्ट केले. पुढे बेल म्हणाले, या रस्त्याचे नाव बदलणे आमच्या यशातील शीख समुदायाच्या मोठ्या योगदानाचे, ऐक्याचे तसेच विविधतेचे प्रतीक ठरेल.