नवी दिल्ली - इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई सिगारेट) या मानवी आरोग्यासाठी हानीकारक असल्यामुळे आज लोकसभेमध्ये ई-सिगारेट प्रतिबंध विधेयक मंजूर झाले. यानुसार ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री, आयात-निर्यात, वाहतूक आणि साठवून ठेवणे आणि जाहीरात करणे इत्यादी गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. जगातील काही तंबाखू कंपन्या भारतात ई-सिगारेटची विक्री करून तरुणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होत्या. या परिस्थितीत एक जबाबदार सरकार म्हणून आम्ही त्यावर बंदी घातली , असे असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
पहिल्यांदा या आदेशाचे उल्लंघन करणार्यांना जास्तीत जास्त 1 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे. तर दुसऱ्यांदा किंवा वारंवार गुन्हा करणाऱ्यांसाठी जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा करण्याची शिफारस केली आहे.
ई सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट-
पेनसारखे दिसणाऱ्या या उपकरणामध्ये सिगारेटमधील तंबाखूऐवजी द्रव्यरुपातील निकोटिनचा समावेश असतो. याला काडेपेटी किंवा लाइटरने पेटवण्याची आवश्यकता नसते. ही सिगारेट बॅटरीवर चालते. यामधील बटन सुरू केले की द्रव्यरूपातील निकोटिनची वाफ बनते आणि ती सिगारेटप्रमाणे तोंडावाटे ओढली जाते.
ई सिगारेटचे परिणाम-
ई सिगारेटमध्ये ई ज्यूस असून यात प्रोपेलीन ग्लायकॉल, व्हेजिटेबल ग्लिसरीन आणि निकोटिन यांचे मिश्रण असते. ई सिगारेटमुळे सीओपीडी, ब्रॉन्कायटिस यांसारखे श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता असते. ई सिगारेटचे फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर गंभीर परिणाम होतात. निकोटिनसह ई सिगारेटमध्ये असलेल्या अन्य घटकांमुळे कर्करोग होण्याचीही शक्यता असते.
सिगारेटला चांगला पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी ई-सिगारेट बाजारात आणली गेली होती. नेहमीच्या सिगारेट्समधील तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे आता सर्वांना माहित झाले आहे. ई-सिगारेट मध्ये तंबाखू किंवा टारचा वापर केला जात नसल्यामुळे त्यात कर्करोगाचा धोका नाही असेच सुरुवातीला ई-सिगारेटबाबत सांगितले जात होते. शिवाय, त्याच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या एलईडी लाईटमुळे, आणि त्यातून धूरही निघत असल्यामुळे ई-सिगारेट ही नेहमीच्या सिगारेट सारखीच भासते, असे असले तरी, कालांतराने, ई-सिगारेट देखील नेहमीच्या तंबाखूयुक्त सिगारेटइतकीच धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिंगापूर, ब्राझिल, इजिप्त, मलेशिया अशा देशांमध्ये आधीच ई-सिगारेट्सवर बंदी घातली आहे.