नवी दिल्ली - भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी राहुल हे ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस पाठवून १५ दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. स्वामींनी याविषयी ट्विटही केले आहे.
राहुल गांधींच्या नागरिकत्वावर याआधीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांच्या अमेठी येथील नामांकनवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांचे नागरिकत्व आणि डिग्रीवर सवाल करताना अपक्ष उमेदवार ध्रुव लाल कौशल यांनी राहुल यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी केली होती.
'गृह मंत्रालयाने आज माझ्या तक्रारीनंतरनोटीस जारी केली आहे?' असे स्वामींनी ट्वीट करत विचारले आहे. त्यांनी राहुल गांधींचे थेट नाव घेता त्यांना 'बुद्धू' असे संबोधले आहे. आता राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून भाजपने त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राहुल यांनी या आरोपांचे उत्तर द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल यांचे खरे नाव राउल विंची आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच, त्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. राहुल यांनी त्यांच्या कागदपत्रांमध्ये इंग्लंडमध्ये असलेल्या स्वतःच्या कंपनीचा उल्लेख केलेला नाही. मात्र, अपक्ष उमेदवाराचे दावे खोडून काढत निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे नामांकन रद्द करण्यास नकार दिला.