भुवनेश्वर (ओडिशा) - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांबद्दल चर्चा केली. व्हिडीयो कॉन्फरंसमध्ये पटनायक यांनी ठाकरेंना अडकलेल्या मजुरांना सुरक्षित ओडिशात पोहोचवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हेदेखील नवी दिल्लीतून या व्हिडीयो कॉन्फरंसमध्ये सहभागी झाले. त्यांनी ओडिशातील स्थलांतरीत मजुरांची नोंदणी करण्यावर भर दिला.
या स्थलांतरीतांना बसद्वारे राज्यात परत नेण्यात येईल. याशिवाय वाहतुकीच्या इतर पर्यायांवरदेखील विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही राज्यातील अधिकारी वाहतुकीच्या साधनासाठी समन्वय साधतील.
ओडिशात परत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी नोंदणी करणे अनिवार्य असेल आणि परतल्यानंतर त्यांना १४ दिवसाचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल.
दरम्यान, याआधी नवीन पटनाईक यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी गुजरातमध्ये अडकलेल्या स्थलांतरीतांना परत ओडिशात नेण्याबाबत चर्चा केली.