शिमला (हिमाचल प्रदेश) - लॉकडाऊनच्या काळात आणि कोरोनाच्या सावटातही निसर्गात काही चांगल्या गोष्टी घडताहेत. अविरत वाहणारी गंगा नदी स्वच्छ झाली आहे. घाटांवर पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. पाणीपातळी थोडी घटली आहे. मात्र, गंगेचे पाणी दिवसेंदिवस स्वच्छ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी गंगा स्वच्छतेसाठी खूप योजना राबविल्या, अनेक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, तरीही गंगा नदी स्वच्छ करण्यात यश आले नाही, जे पैसे खर्चूनही शक्य झाले नाही, ते लॉकडाऊनमुळे शक्य झाले आहे. एका विषाणुच्या भितीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने गंगेचे पाणी निर्मळ केले आहे.
फक्त गंगा नदीच नव्हे, तर देशभरातील इतर नदी, नाले, ओढे यांचे पाणी स्वच्छ झाले आहे. हिमाचल प्रदेशबद्दल बोलायचे झाल्यास ब्यास नदी असो की सतलूज किंवा यमुना. या सर्वच नद्यांचे पाणी इतके स्वच्छ झाले आहे, की नदीच्या तळावरील दगड, शेवाळसुद्धा दिसू लागला आहे.
या नद्यांमध्ये ना कचरा टाकला जातोय, ना कारखान्यांचे दुषित पाणी. वाहनांची रेलचेल थांबल्याने आणि कारखाने बंद असल्याने विषारी वायूसुद्धा नाही. यामुळे निसर्ग थोड्याफार प्रमाणात का होईना त्याच्या मुळ रुपात परतत आहे. पर्यटक येत नसल्याने कचराही होत नाहीए.
मानवी चुकांमुळे या नद्यांचे पाणी विषारी होत चालले होते. सरकार हे पाणी स्वच्छ करण्यासाठी हजारो, करोडो रुपयांचा निधी जाहीर करतय. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हे लॉकडाऊन एक दिवस संपेल आणि पुन्हा कारखान्याचे दुषित पाणी आणि कचरा या नद्यांमध्ये पोहोचेल. लॉकडाऊनमुळे स्वच्छ झालेल्या या नद्यांची स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आणि कठोर कायदे करण्याची गरज नक्कीच आहे.