गांधीनगर - गुजरातच्या सौराष्ट्र प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन लहानग्यांचाही समावेश होता. मंगळवारी संपूर्ण प्रांतात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.
जामनगर जिल्ह्यातील राक्का गावात एका ३५ वर्षीय महिला आणि तिच्या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर, द्वारका जिल्ह्यामधील विरमदाद गावामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. यासोबतच, बोटाद जिल्ह्यातील दोन गावांमध्येही वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच वर्षीय मुलगा, त्याचे साठ वर्षीय आजोबा, आणि एका १७ वर्षीय मुलीचा समावेश होता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
या सर्वांचे मृतदेह नजीकच्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सौराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस पडला. विशेषतः जामनगर, गीर सोमनाथ, जुनागढ, राजकोट आणि भावनगर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही या आठवड्यात विविध भागात वीज कोसळून १०५ जणांचे मृत्यू झाले.
हेही वाचा : बिहारमध्ये वीज कोसळून मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून १०५ वर, मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत