टीकमगढ - एका सर्वसामान्य व्यक्तीने अहिंसेचा वापर करत जगात उदाहरण प्रस्थापित केले. मोठ्या-मोठ्या शत्रूंना त्याच्यासमोर हार मानावी लागली. सत्याग्रहाचा वापर करून गांधीजी महात्मा बनले. त्यांना सर्वांनी राष्ट्रपिता मानले. गांधीजींचे विचार जगासाठी आजही मार्गदर्शक आहेत. जगभरातील अनेकांनी त्यांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. यंदा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त यातील काही आठवणींना आपण उजाळा देत आहोत.
हेही वाचा - विकास करा पण...वाचा महात्मा गांधींचे पर्यावरण अन् विकासाच्या मुद्द्यांवरील परखड मत
गांधीजींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात अनेकजण उत्साहाने सहभागी होत होते. असेच गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाने आणि विचारांनी भारावलेले दुर्गा प्रसाद शर्मा यांनीही गांधीजींना पत्र लिहून त्यांच्यासह कदमताल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गांधीजी १९३० ला झाशीला गेले होते. त्यांनी तेथील लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर दुर्गा प्रसाद यांनी गांधीजींना पत्र लिहून आंदोलनात भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली.
गांधींजींनी स्वतःच्या सचिवाच्या माध्यमातून दुर्गा प्रसाद यांच्या पत्राचे उत्तर म्हणून एक पत्र पाठवले. यामध्ये स्वातंत्र्य चळवळीत आपल्यासह अधिकाधिक युवकांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यास गांधीजींनी सांगितले होते. हे पत्र दुर्गा प्रसाद यांच्या सूनबाई मनोरमा देवी यांनी आजही वारशाप्रमाणे सांभाळून ठेवले आहे.
हेही वाचा - दिल्लीतील गांधी आश्रम आजही केंद्र सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत...
'तुम्हाला राजस्थान-दिल्ली-मुंबईला येण्याची गरज नाही. तुम्ही बुंदेलखंडात राहूनच आंदोलन करा. एक ऊर्जेने भरलेल्या चांगली लोकांची टीम तयार करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला सहाय्य करा,' असे गांधीजींनी पत्राच्या उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. या पत्रानंतर दुर्गा प्रसाद यांनी योजना तयार करून कामाला सुरुवात केली. गांधीजींच्या मार्गादर्शनाखाली सुरू केलेले काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरुच ठेवले. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावच असा होता की, त्यांच्या एका शब्दाखातर लोक बलिदान करायलाही तयार झाले होते.
गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासोबतच या लढ्यासाठी धन जमा करण्यासही लोकांना सांगितले होते. तेव्हा मनोरमा देवी यांच्या आई देवका देवी पाठक यांनीही त्यांच्या नाकातील नथनी दान केली होती. त्यांनीही त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती. त्यावेळी मनोरमा यांचे वडील चतुर्भुज पाठक हे भूमिगत होते. त्यामुळे त्यांच्या आईने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले होते. मनोरमा शर्मा यांचे संपूर्ण कुटुंब गांधीजींच्या विचारधारेने प्रेरित होते आणि आजही आहे. त्यांचे वडील चतुर्भुज पाठक यांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान 1972 मध्ये चंबळच्या डाकूंना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. यानंतर त्यातील अनेक डाकूंनी हिंसा सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारला होता. तेही महात्मा गांधीजींच्या विचारधारेचे अनुसरण करत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले.
हेही वाचा - लखनऊ : ज्या शहरात गांधी आणि नेहरू यांची पहिली भेट झाली...