मुंबई - मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांचा एका दिवसाचा गल्ला १०० कोटींपेक्षा जास्त आहे, तेव्हा अर्थव्यवस्था संकटात कशी, असा उलट सवाल केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत आलेले केंद्रीय कायदेमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था, काश्मीर बाबात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिले.
कायदेमंत्री म्हणाले, २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांचा गल्ला १०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे कोमल नहाटा यांनी म्हटले आहे. जर देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा परत येत असेल तर अर्थव्यवस्था कमकुवत आहे, असे कसे म्हणता येईल.
काश्मीरविषयी विचारलेल्या एका प्रश्नावर रवीशंकर प्रसाद म्हणाले, काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, मोदी हे जागतिक नेते असून सहा देशांनी मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे. मोदी चांगले काम करत असल्याने जग मोदींचा सन्मान करत आहे. भारताच्या प्रगतीचा जगावर परिणाम होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशात अनेक पंतप्रधान झाले मात्र, फक्त चार पंतप्रधान लोकांनी निवडले. त्यात मोदींचे स्थान आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.