स्मार्ट फोन्स आणि टीव्ही सुविधांच्या अभावामुळे गरिबांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले जात आहे. कोरोनाने जे अनेक अडथळे निर्माण केले आहेत, त्यात एक रोजगार गमावण्याचा तर आहेच आणि दुसरा उपजीविकेत निर्माण झालेली बाधा हाही आहे. मात्र तिसरा आहे तो अनेक आईवडिल आणि मुलांना शिक्षणासाठी कराव्या लागणार्या संघर्षाचा आहे. ही समस्या केवळ गरिबांपुरतीच नाही. तर अनेक मध्यमवर्गीय पालकही या समस्येचा सामना करत आहेत.
ऑनलाईन शिक्षणासाठी आपल्या मुलांना स्मार्ट फोन्स किंवा टॅब्स विकत घेऊन देणे, टीव्हीची सुविधा आणि इंटरनेट जोडणी देणे अशा कुटुंबांसाठी अवघड होत चालले आहे. सरकार आपल्या विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देत असले तरी, विद्यार्थ्यांना आपला गृहपाठ करण्यासाठी आणि शंकानिरसन करण्यासाठी आपल्या फोन्सवर अवलंबून रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत, पालकांना आपल्या मुलांना स्मार्टफोन्स विकत घ्यावे लागत असून इतरांना टीव्ही विकत घ्यावे लागतात. आणि असेही अनेक पालक आहेत की ज्यांच्यावर मुलांकडून सातत्याने, स्मार्ट फोन्सची गरज असो वा नसो, फोन्स
विकत घेऊन देण्यासाठी दबाव येत आहे. याहीपुढे, इंटरनेट सिग्नलसाठी झाडांवर तसेच लहान टेकड्यांवर चढून डेटाचा वेग घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा संघर्ष सर्वांनाच माहित आहे. शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार व्हॉट्सअप समूह तयार केले असून त्यात आम्ही गृहपाठ आणि सूचना पाठवतो.
विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्यास सांगितले जाते आणि उत्तरपत्रिकांची छायाचित्रे पुन्हा आमच्याकडे पाठवायला सांगतो. विशेषतः सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत अनिवार्य आहे. याच प्रमुख कारणामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेषत्वाने स्मार्ट फोन पाल्यांसाठी विकत घेऊन द्यावे लागत आहेत, असे अनेक शिक्षकांनी ईनाडूला सांगितले.
टीव्ही, फोन ज्यांना परवडू शकत नाहीत, ते ऑनलाईन धड्यांपासून दूर जात आहेत. शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी ज्यांचे रोजगार कोरोनामुळे गेले आहेत, त्या गरिब, मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय पालकांसाठी हे असह्य ओझे आहे, हे मान्य केले. आगीत तेल ओतणे या म्हणीची आठवण करून देणारी ही स्थिती आहे. त्यातच अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट सिग्नल आणि वेग मिळवण्यासाठी झाडांवर तसेच लहान टेकड्यांवर चढून बसावे लागत आहे, त्या संघर्षाचीही भर पडली आहे.
काही शाळांमध्ये स्थिती खालीलप्रमाणे आहे...
आदिलाबाद जिल्हा उतनुरू जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत दहावी अ वर्गात 32 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी 17 जणांकडे स्मार्टफोन्स आहेत. त्यांच्यापैकी, 10 जण या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्मार्ट फोन खरेदी करू शकले.
असिफाबाद विभाग कोरम भीम जिल्ह्यात, केरमेरी मंडळात एक प्राथमिक शाळा आहे. तेथे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या इयत्तेत 204 विद्यार्थी शिकतात. त्यापैकी 30 विद्यार्थ्यांनी या महिन्याच्या पहिल्या तारखेनंतर स्मार्ट फोन्स खरेदी केले आहेत. ज्यांना असे फोन खरेदी करणे परवडत नाही, ते पंचायत समिती कार्यालयातील दूरचित्रवाणीसमोर बसून वर्गाला हजेरी लावतात.
मेडचल जिल्हा राजपत्रित प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष मुरली कृष्णा यांनी रोटरी क्लबच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला आणि मेडचल जिल्ह्यात अनेक लोकांना इंटरनेट डेटा रिचार्ज करणे स्मार्टफोन असूनही परवडत नाही, असे त्यांच्या निदर्शनास आणले. यानंतर, रोटरी क्लबने कुकनूर उच्च माध्यमिक शाळेतील 40 विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचा डेटा रिचार्ज करून दिला.
आदिलाबाद ग्रामीण विभागातील अंकोली उच्च माध्यमिक शाळेत 327 विद्यार्थ्यांपैकी 37 विद्यार्थ्यांकडे दूरचित्रवाणी संच उपलब्ध नाहीत. त्यापैकी केवळ 151 विद्यार्थ्यांकडे फोन्स आहेत.
रोजंदारीवर काम करणाऱ्यांना स्मार्ट फोन्स परवडत नाहीत -
हे छायाचित्र गंगा आणि तिच्या तीन मुलांचे आहे जी आदिलाबाद जिल्ह्यातील इंद्रवेल्लीनजीक लाला मुतनूर गावात रहाते. ही मुले चौथी, सहावी आणि दहावी वर्गात शिकतात. तिच्या पतीच्या मृत्युनंतर, ती एकटीच रोजंदारीवर कामाला जाऊन आपल्या कुटुंबाचे ओझे सांभाळते. घरात दूरचित्रवाणी संच नाही. ते स्मार्टफोनही खरेदी करू शकत नाहीत. सध्याच्या घडीला, तिन्ही मुले ऑनलाईन आणि दूरचित्रवाणीवर दिल्या जाणाऱया धड्यांपासूनही वंचित आहेत. गंगाचा सर्वात मोठा मुलगा लक्ष्मीकांतने इनाडूला सांगितले की, सुरूवातीला मी शेजाऱयांच्या घरात दोन तीन दिवस जाऊन दूरचित्रवाणावरील धडे ऐकत असे. परंतु ते त्यांना आपल्या शेतात कामाला जावे लागत असल्याने ते घर बंद करून जात. त्यामुळे मला या धड्यांवर पाणी सोडावे लागले. फोन विकत घेण्यासाठी वाळूखाणीत मजूर म्हणून काम करावे लागले.
करीमनगर जिल्ह्यात गंगाधर मंडल ओडयाराममध्ये सिर्रासिवराम हे एका विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सरकारी उच्च माध्यमिक शाळेत दहावीच्या इयत्तेत आहे. त्याचे वडील कुलीचे काम करतात. तर आई आजारी असते. तो सांगतो की, माझ्या वडलांची कमाई ही माझ्या आईची औषधे आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यास पुरेशी नाही. त्यामुळे मला महिनाभर वाळू खाणीत मजूर म्हणून काम करावे लागले आणि त्या पैशातून मी 7, 700 रूपयांना स्मार्टफोन खरेदी केला.
स्मार्टफोनसाठी कर्ज
आपल्या मोबाईल फोनवर डिजिटल वर्गातील ध़डे ऐकणाऱया या विद्यार्थ्याचे नाव बोद्दु अरूण आहे. मेहबूबाबाद जिल्ह्यातील गुडूर विभागातील लक्ष्मीपुरमचा रहिवासी असलेला अरूण थिगालवेणी सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील दहावीचा विद्यार्थी आहे. जेव्हा आर्थिक साधनांनी त्याला साथ दिली नाही, तेव्हा त्याच्या वडलांनी, दर्गय्या यांनी, जे एक धनगर आहेत, 8,500 रूपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले.
15 दिवसांचे ओझे 70 कोटी रूपये
तिसरी इयत्ता ते दहावीपर्यंत डिजिटल वर्ग 1 जुलैपासून सुरू करण्यात आले होते. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, त्यादिवसापासून, 1, 91, 768 विद्यार्थी स्मार्ट फोन्स आणि लॅपटॉप्सच्या माध्यमातून वर्गांना हजेरी लावत आहेत. हा आकडा अलिकडेच 2,19,285 इतका वाढला आहे आणि ही वाढ 27,517 इतकी झाली आहे. याचा अर्थ असा आहे की, फोन्स आणि इतर साधनांची खरेदीही त्या प्रमाणात वाढली आहे.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अनधिकृत अंदाजानुसार, गेल्या 15 दिवसात राज्यभरात किमान दहा लाख फोन्सची खरेदी झाली असेल. एक स्मार्टफोन साधारणतः 7 हजार रूपयांना असे आपण गृहित धरले तर, संपूर्ण खरेदीची किमत बाजारात 15 दिवसात 70 कोटी रूपयांपर्यंत जाते.