लखनौ - देशातली अनेक राज्यांत रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्यास असलेले उत्तर प्रदेशातील कामगार, मजूर लोक सध्या लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले आहेत. या सर्व मजुरांना त्यांच्या घरी परत पोहोचवणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. यासंदर्भात आराखडा बनवणे सुरू असल्याचेही ते म्हणाले.
आदित्यनाथ यांनी यांसदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. इतर राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांची यादी बनवा, असे आदेश आदित्यनाथ यांनी दिले आहेत. तसेच त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करून राज्यात परत आणले जाईल, जेणेकरून कोरोनाबाबत सर्व खबरदारी पाळली जाईल, असेही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
स्थलांतरित मजुरांना परत राज्यात आणताना त्यांनी १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. यानंतरच त्यांना अन्नधान्य आणि १ हजार रुपये रोख रकमेसह सुरक्षित त्यांची घरी पोहोचवले जाईल, असेही आदित्यनाथ म्हणाले.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची स्थिती काय आहे, याचा आढावाही यावेळी आदित्यनाथ यांनी घेतला. राज्यातील सर्व हॉस्पिट्ल आणि मेडिकल्सवर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्यााबाबतही त्यांनी यावेळी निर्देश दिले. राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ओळखून विशिष्ट काळजी घेणे सुरू आहे. संपूर्ण देशाला उत्तर प्रदेश मॉडेल दिशा दाखवले, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.