नवी दिल्ली - देशभरामध्ये 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. 14 दिवसांचा पहिला टप्पा आज पूर्ण होत असून देशात अजून 19 दिवस संचारबंदी राहणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. याकाळात देशातील अनेक उद्योगधंदे बंद आहेत. म्हणून वेतनासंबंधी तक्रारी सोडविण्यासाठी कामगार मंत्रालयाने 20 नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नियंत्रण कक्षात कामगारांच्या वेतनासंबधी तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नका, किंवा त्यांना कामावरून कमी करू नका, असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, अनेक कंपन्या कामगारांना कमी करत आहेत, तसेच कामावरून काढून टाकत आहेत. आता या कामगारांना मंत्रालयाकडे आपले गाऱ्हाणे मांडता येणार आहे.
कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू आहे. सर्व उद्योगधंदे आणि व्यापार ठप्प झाला आहे. दक्षिण आशियायी देशांचा विकासदर मोठ्या प्रमाणावर घसरणार असल्याचे जागतिक बँकेने सांगितले आहे. तसेच अनेक देशांपूढे आर्थिक अडचणी गंभीर होणार असल्याचा इशारा दिला आहे.