भोपाळ - लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगार विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. मात्र, नुकत्याच जारी झालेल्या केंद्र सरकारच्या नियमावलीमुळे कामगार आपल्या मूळगावी जाण्यासाठी धडपडत आहेत. अशातच मध्यप्रदेश सीमेवर अनेक स्थलांतरित कामगार जमा झाले आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेशासह इतरही राज्यातील मजुरांचे लोंढे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर जमा होत आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हे कामगार सीमेवर आले आहेत. मात्र, सीमेवर त्यांना अडविण्यात आले आहे. बडवानी जिल्ह्यातील पोलिसांनी सर्व मजूरांना अडवले आहे. आज मजुरांनी चिडून पोलिसांवर दगडफेकही केली. मजूरांना घरी पाठविण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेश राज्य सरकारशी सतत संपर्क साधला जात असल्याचे बडवानी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी सांगितले.
बडवानी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये
बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील बिजासन गावाजवळ महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामगार घरी जाण्यासाठी पायी प्रवास करत आहेत. मात्र, बडवानी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे पोलीस मजुरांना पुढे जाऊ देत नाहीत. मात्र, मजुरांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. त्यामुळे प्रशासनावरही दबाव वाढला आहे.