गांधीनगर : गुजरातच्या कच्छमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या पत्नीसह पोटच्या तीन मुलींची हत्या करत, एक व्यक्ती फरार झाली आहे. या तीनही मुली दहा वर्षांहून कमी वयाच्या होत्या. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखू संघर उर्फ शिवजी याने आपली पत्नी भावना हिला घरगुती वादातून विष दिले. यानंतर तिने घराबाहेर येत आरडाओरड केला. यादरम्यानच तिची प्रकृती खालावल्याने शेजारच्या लोकांनी तिला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, शेजारचे लोक भावनाला घेऊन रुग्णालयात गेल्याची संधी साधून या नराधमाने आपल्या तीन मुलींची हत्या केली. ध्रुपती (१०), किंजल (७) आणि धर्मिष्ठा (२) अशी या तीन मुलींची नावे होती. यानंतर तो घरातून पळून गेला.
शिवजीने असे का केले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. दरम्यान, पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करत शिवजीच्या शोधासाठी काही पथके तयार केली आहेत.