बंगळुरु - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांच्यावर सध्या टीकेची झोड उठत आहे. देश कोरोनासारख्या महामारीच्या संकटात असताना कुमरस्वामी आपल्या मुलाच्या लग्नात व्यग्र असल्याचे अनेक राजकारण्यांनी म्हटले होते. यावर आता कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुमारस्वामी म्हणाले, या लग्नाआधी सावधगिरी म्हणून सर्व उपाययोजना केल्या गेल्या होत्या. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे, अशा भयंकर स्थितीत सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करतच हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी सामाजिक अंतर ठेवत इतर सुरक्षेच्या बाबींकडेही लक्ष दिले गेले होते.
शुक्रवारी दुपारी कुमारस्वामी यांनी ट्विट केले, की आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या लाखो लोकांचे आभार. जेव्हा ही परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा सगळे सोबत येऊन भोजन करु. कुमारस्वामी यांचा मुलगा निखील गौडा आणि काँग्रेस नेते एम कृष्णाप्पा यांची नात रेवथी यांनी १७ एप्रिलला लग्नगाठ बांधली. या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुमारस्वामी यांच्यावर टीका होत आहे.