नवी दिल्ली - निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या एकतर्फी निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जात आहे. मात्र, पाकिस्तानने हा विजय आमचाच असल्याचे म्हटले आहे. त्यावर खासदार गिरीराज सिंह यांनी ‘चूक तुमची नाही, निकाल इंग्रजीत होता,’ असे म्हणत पाकची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
कुलभूषण यांना सोडून देण्याचा किंवा भारताला सोपवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला नाही, हा पाककडून स्वतःचा विजय मानला जात आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा आमचा मोठा विजय आहे असे ट्विट करण्यात आले. 'आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देताच कुलभूषण जाधव यांची सुटका करण्याची तसेच त्यांना भारतात परत पाठवण्याची केलेली भारताची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळली. हा पाकिस्तानचा मोठा विजय आहे,' असे ट्विट करण्यात आले होते. गिरीराज सिंहांनी यावर दिलेला रिप्लाय प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, त्यांना अनेक लाईक्स मिळाले असून अनेकांनी त्यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
क्रिकेट विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी चाहत्यांची इंग्रजी भाषेच्या अज्ञानावरुन मोठ्या प्रमाणात चेष्टा करण्यात आली होती. आता गिरीराज सिंहांनीही त्यावरूनच लगावलेला टोला भारतीयांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.