रायपूर - छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील एका बीट गार्डचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. कोणतीही परवानगी न घेता, बांबूची तोडणी करत असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना या बीट गार्डने चांगलेच झापले आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही अधिकारी या बीट गार्डहून वरच्या पदावर कार्यरत आहेत. तरीही, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या गार्डने त्यांना चांगलेच झापले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विभागीय वन अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेखर असे या बीट गार्डचे नाव आहे. तर, अधिकाऱ्यांपैकी एक फॉरेस्ट रेंजर मृत्यूंजय सिंह आहे. कोणतीही परवानगी न घेता बांबूची तोडणी करत असल्यामुळे शेखरने केवळ या अधिकाऱ्यांना झापले नाही, तर त्यांच्यावर संबंधित कलमांतर्गत कारवाईचाही इशारा दिला. तेवढ्यावरच न थांबता शेखर यांनी याबाबत ११ कुऱ्हाडी आणि ३६५ नग बांबू जप्त केला. तसेच रेंजर, डेप्युटी रेंजर, दुसरा बीट गार्ड आणि ११ मजूरांविरोधात गुन्हाही दाखल केला होता.
यानंतर ईटीव्ही भारतने विभागीय वन अधिकारी शमा फारूखी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल तयार होत नाही, तोपर्यंत याबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. तसेच, रेंजर मृत्यूंजय सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन नंबर बंद येत आहे. शिवाय ते सध्या कुठे आहेत याबाबतही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
या सर्व प्रकरणानंतर बीट गार्ड शेखरनेही मौन धारण केले आहे. तसेच, अधिकारीही याबाबत काहीही बोलण्यास नकार देत आहेत. मात्र या सगळ्यात जंगलातील अवैध बांबू कत्तल समोर आली आहे हे नक्की.
हेही वाचा : गुरुदासपूर - सीमा सुरक्षा दलाकडून पाकिस्तानातून तस्करी होणारा अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त