हैदराबाद - तेलंगणामध्ये एका पत्रकाराच्या नऊ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या केली. ही घटना राज्यातील मेहबुबाबाद जिल्ह्यातील आहे. रविवारी मुलाचे अपहरण करण्यात आले होते आणि अपहरणकर्त्यांनी कुटुंबाकडून 45 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
पोलिसांना आज सकाळी शहराबाहेर मुलाचा मृतदेह मिळाला. याप्रकरणी अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना मुलाचे अपहरण करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ; 'आयएनएस कवरत्ती' घेणार शत्रूचा अचूक ठाव
अपहरण करणारे मोटारसायकलवरून आले होते, त्यांनी मुलाचे अपहरण केल्यानंतर त्याच्या आईला फोन लावून मुलगा परत हवा असेल तर 45 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर हे कुंटुंब पैशांची व्यवस्था करण्याच्या तयारीत होते. अपहरणकर्त्याला त्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शहराबाहेर मुलाचा मृतदेह आढळून आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांची दहा पथके याप्रकरणाचा तपास करत आहेत.