नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. तामिळ अभिनेत्री आणि नेत्या खुशबू सुंदर यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खुशबू या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. खुशबू सुंदर यांनी यांनी 2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्या डीएमके (द्रविड मुन्नेत्र कळघम) पक्षाच्या सदस्य होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
खुशबू सुंदर यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर चाहत्यांनी त्यांचे मंदिरही बांधले आहे. त्यांचे मंदिर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे बांधण्यात आले होते. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते.
2019 मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्या नाराज होत्या. काँग्रेसच्या विरोधात जाऊन त्यांनी नव्या शिक्षण धोरणाचे समर्थन केले होते. तसेच काँग्रेस देशातील वास्तविकतेशी जोडलेले नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या.
तथापि, खुशबू सुंदर यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. खुशबू यांच्या जाण्याने काँग्रेसचे काहीच नुकसान झालेले नाही, असे काँग्रेस नेते के.एस.अलागिरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 2021 मध्ये तामिळनाडूत विधानसभा निवडणूक होणार आहे.