न्युयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (२२ सप्टेंबर) अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भारतीय अमेरिकी नागरिकांची अफाट गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, खलिस्तानी आणि खोटे काश्मीरी गट पाकिस्तानच्या सहकार्यानं कार्यक्रम ठिकाणी गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत.
खलिस्तानी आणि पाकिस्तान धार्जिण्या गटांनी समाजमाध्यमांवरून हिंसाचार आणि तिरस्कारयुक्त संदेश पसरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काश्मीरबद्दल खोटी माहिती समाजमाध्यमांवर पसरत आहे. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन भारतामध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत, अशा आशयाचे खोटे संदेश फिरत आहेत.
जे लोक काश्मीरबाबत खोटी माहिती पसरवत आहेत ते काश्मीरी नाहीत. त्यांना काश्मीरी भाषा येत नाही, मात्र, पाकिस्तानच्या मदतीने ते खोटी माहिती पसरवत आहेत. अमेरिकेमध्ये राहत असलेले हिंदु आणि शीख समुदायामध्ये सौहदार्यपुर्ण संबध आहेत. मात्र, समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या अफवांमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, असे शीख्स् ऑफ अमेरिका या संस्थेचे संस्थापक जसप्रीत सिंह यांनी सांगितले.
हाऊडी मोदी कार्यक्रमा विरोधात निदर्शने करण्यासाठी तीन संघटनांनी परवानगी मागितली आहे, त्यामध्ये पाकिस्तान धार्जिण्या संघटनांचा समावेश आहे, असे न्युयॉर्क शहर पोलिसांनी सांगितले.