तिरुअनंतपुरम - केरळच्या 'श्री चित्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि टेक्नॉलजी'ने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन 'रॅपिड टेस्टिंग किट'चा शोध लावला आहे. या किटला 'चित्रा जीन लॅप' असे नाव देण्यात आले असून येणाऱ्या काळात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचे टेस्टींग करण्याची क्षमता यामुळे वाढणार आहे.
श्री चित्रा संस्थेकडून नव्याने विकसित करण्यात आलेल्या टेस्ट किट्सचा दर्जा पडताळण्यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) विभागाला परवानी देण्यात आहे. व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये हे किट्स 100 टक्के अचूक असल्याची माहिती दिलीय. हे केंद्र अलाप्पुहा जिल्ह्यात आहे.
आयसीएमआर आणि ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडियाने संबंधित किट मंजूर केल्यानंतर त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येणार आहे. 'रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन लूप मेडिएटेड अॅम्प्लीफिकेशन' तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानावर आधारित किट्स जगात पहिल्यांदाच विकसित करण्यात आल्याचे या संस्थेने सांगितले आहे. तसेच हे टेस्ट किट्स 'एन-जनरेशन' असून ते 'कोवीड-१९'च्या विरोधात सक्षमपणे काम करू शकतात. तसेच एखाद्या ठराविक जनुकात प्रदेशनिहाय काही अनुवांशिक बदल झाल्यानंतरही त्याचा चाचण्यांच्या परिणामांवर प्रभाव पडणार नाही.
या 'रॅपिड टेस्टिंग किट'मुळे कोविड चाचणीसाठी लागणारा कालावधी देखील कमी करता येऊ शकतो. कारण नमुने गोळा केल्यापासून निकाल शोधण्यासाठी चित्रा किट्सला दोन तासांपेक्षा कमी वेळ लागतो. तुलनात्मकदृष्ट्या खर्चही कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एका चाचणीसाठी जास्तीत जास्त 1000 रुपये खर्च होत असल्याचे श्री चित्रा किट्सच्या वतीने सांगण्यात आले.