तिरुवअनंतपुरम - घरातून लग्नाला विरोध असल्यामुळे, एक तरुण-तरुणी सोबत पळून गेले होते. त्यानंतर संरक्षणासाठी ते पोलिसांकडे गेले, तेव्हा त्यांच्या सोबत राहण्याला दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. मात्र, लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन न केल्याचा गुन्हा या दोघांवर दाखल केला गेला आहे.
केरळच्या कोळीकोड जिल्ह्यातील ही घटना. जिल्ह्याच्या तामरासेर्री गावात राहणारी २१ वर्षाची तरुणी आपल्या २३ वर्षीय प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती. हे दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे असल्यामुळे तरुणीच्या घरातून त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यातून त्यांनी हे पाऊल उचलले. मुलगी घरातून पळून गेल्याचे लक्षात येताच तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, हे जोडपेही पोलिसांकडे गेले. पोलिसांनी त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले. यावेळी हे दोघेही सज्ञान आहेत हे लक्षात घेतले गेले. तसेच, मुलगीही तिच्या मर्जीने या तरुणासोबत आली होती. त्यामुळे, त्यांना सोबत राहण्यास परवानगी तर मिळाली. मात्र, त्याचवेळी दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना असे निर्देश दिले, की या दोघांवर लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा.
दंडाधिकाऱ्यांनी यावेळी हे निरीक्षण नोंदवले, की या दोघांचे घरातून बाहेर पडण्याचे कारण 'अत्यावश्यक' नव्हते. त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग केला आहे. लॉकडाऊन काळात घरातून बाहेर पडल्यामुळे अनेकांवर गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. मात्र, अशा प्रकारची ही पहिलीच घटना समोर आली आहे.
हेही वाचा : १०३ वर्षीय इटालियन आजीबाईंंची कोरोनावर मात!