तिरुवनंतपूरम - केरळमध्ये तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30 किलो सोने जप्त करण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. मात्र, वादग्रस्त सोन्याच्या तस्करी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सिमा शुल्क अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर सिमा शुल्क अधिकाऱ्यांची बदली तात्पुरती रोखण्यात आली आहे.
आयुक्त मोहम्मद युसूफ यांनी संबधित आदेश दिला होता. यामध्ये विविध युनिटमधील एकूण 42 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. यामध्ये सोने तस्करी प्रकरणाची चौकशी करणारे मुख्य कर्मचारी समाविष्ट आहेत. अचानक झालेल्या बदलीमुळे यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत राहिले होते. त्यावर अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश रद्द नाही, तर फक्त रोखण्यात आला आहे.
सोने तस्करी प्रकरणावरून केरळमधील पिनराई विजयन सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या प्रकरणात विजयन यांचे माजी मुख्य सचिव आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव एम. शिवशंकर यांचेही नाव समोर येत आहे.
काय आहे प्रकरण?
दुबईवरून विमानाद्वारे केरळात आणण्यात आलेल्या राजनैतिक सामानात 30 किलो सोने आढळून आले होते. या सोन्याची तस्करी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली करण्यात येत होती. कारण राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानाची तपासणी केली जात नाही. या तस्करीप्रकरणी युएई कौन्सलेट विभागाचा माजी कर्मचारी पी. एस सारीथ याला सीमा शुल्क विभागाने 5 जुलैला अटक केली होती. याप्रकरणी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचे तपासात उघड होत आहे. आरोपी स्वप्ना आणि संदिप नायर यांना बंगळुरुतून अटक करण्यात आली आहे.