दिसपूर(काझीरंगा) - आसामधील पूर परिस्थिती गंभार होत चालली आहे. काझीरंगा नॅशनल पार्कचा 90 टक्के भाग पूराच्या पाण्याखाली गेला असून एका गेंड्यासह 14 प्राण्याचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत एक शिंगी गेंड्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
काझीरंगा नॅशनल पार्क प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 223 विभागांपैकी 143 विभाग पूराच्या पाण्याखाली गेले आहेत. यात हरिण, हत्ती आणि एक शिंगी गेंड्यांसह शेकडो वन्य प्राणी पाण्यात अडकले आहेत. काही प्राण्यांनी उद्यानातील उंच ठिकाणी आसरा घेत आपला जीव वाचवला आहे. त्यामुळे उद्यान प्रशासन व जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग 37 वरील वेग मर्यादा कमी ठेवण्याचे आवाहन चालकांना केले आहे.
वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांसाठी 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. पूर परिस्थितीमुळे उद्यानातील प्राणी आसरा शोधताना अनेक वेळा रस्ता पार करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला.
आसाममधील काझीरंगा हे एकशिंगी गेंड्याचे जगातील सर्वात मोठा अधिवास असून त्या ठिकाणी सर्वात जास्त गेंडे राहतात. पुरामुळे आसाममधील 25 जिल्हे बाधित झाले असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.