इराणमधून आणून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोविड-१९ ची लागण होण्याची अधिक शक्यता असल्याचे वाटू लागले आहे.
प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर जैसलमेरच्या विलगीकरण केंद्रात मला अस्वस्थ वाटत आहे. १४ दिवस आम्हाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आणि आता २० दिवस होत आले आहेत. आम्हाला कुणीही काहीही सांगत नाही, असे वाटते की आम्हाला केवळ अलग ठेवण्यात आले आहे, असे इराणमधील वैद्यकीय विद्यार्थिनी अनसब नबी हिने सांगितले. तिला १५ मार्च रोजी इराणमधून आणले आहे. अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरणात ठेवले नसल्याने ही अनिश्चितता आहे, असे तिला वाटते. आम्ही येथे केवळ विद्यार्थी नाही. येथे इराणच्या कौममधून आणलेले भाविकही आहेत आणि त्यापैकी काही कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत, असे नबीने 'ईटीव्ही भारत'शी दूरध्वनीवरून जैसलमेरहून बोलताना सांगितले.
तिने पुढे असेही सांगितले की येथे आम्हाला जेवणासाठी एकच हॉल आहे आणि २० लोकांमध्ये मिळून फक्त दोन स्वच्छतागृहे आहेत. २० लोकांना एकाच हॉलमध्ये ठेवले आहे, जो एका मोठ्या इमारतीचा भाग आहे. अनसाबने सांगितले की जैसलमेर विलगीकरण केंद्रात केवळ काश्मिरी विद्यार्थ्यांना ठेवलेले नाही. २५० हून अधिक काश्मिरी विद्यार्थी राजस्थानच्या जैसलमेर आणि जोधपूर क्वारंटाईन केंद्रात ठेवले असून ते घरी पाठवण्याच्या प्रतिक्षेत आहेत. राजस्थान सरकारच्या माहितीनुसार, जैसलमेर विलगीकरण केंद्रात १७० काश्मिरी विद्यार्थी असून त्यापैकी इराणमधून आलेले १०० आहेत.
भारतीय सरकारने १४ मार्च रोजी इराणमधून जवळपास ३०० विद्यार्थ्यांना मायदेशी आणले आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना जैसलमेरच्या लष्कर कल्याण केंद्रात विलग करून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले. नोवल कोरोना विषाणुचा जगभरात उद्रेक झाल्यावर, इराण हा मध्यपूर्व आशियामधील सर्वाधिक तडाखा बसलेला देश ठरला, जेथे ३ हजाराहून अधिक लोक आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना ही काळजी आहे की विविध जोखमीच्या गटांना एकत्र केले असल्याने खबरदारी घेऊन जे विद्यार्थी इराणच्या साथीतून सहीसलामत बाहेर आले, ते आता पुन्हा कोरोनाला बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अब्दुल रऊफ या दुसऱ्या एका वैद्यकीय विद्यार्थ्याने सांगितले की १४ मार्च रोजी आम्ही दिल्लीत उतरलो आणि तेथून आम्हाला जैसलमेरला नेण्यात आले. भाविक आणि विद्यार्थी यांच्यात काहीच विभागणी केली नाही. आम्हा सर्वांना एकत्रच ठेवण्यात आले. हे सर्व भाविक कौमहून थेट आणण्यात आल्याने ते विषाणुवाहक असल्याची दाट शक्यता आहे, हे आम्हा सर्वांना माहित आहे. म्हणून आम्ही अधिकार्यांना आम्हाला आणखी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची विनंती केली. पण त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. या इमारतीत किमान ६ महाराष्ट्रातील लोक आहेत जे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आमची भीती आणखीच वाढली आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले, की ब्लॉक्स वेगवेगळे असल्याने जरी एखादा पॉझिटिव्ह रूग्ण असला तरीही तेवढाच एक ब्लॉक १४ व्या दिवशी अलग करण्यात येईल आणि इतरांनी थांबण्याची गरज नाही. पण आता ते नवीन नियम अंमलात आणत आहेत. रऊफने पुढे सांगितले की आता ते आम्हाला आणखी काही दिवस थांबावे लागेल, असे सांगत आहेत. आम्हाला फक्त आम्ही घरी परत कधी जाऊ शकतो, एवढेच जाणून घ्यायचे आहे.
ईटीव्ही भारतने राजस्थानातील विलगीकरण केंद्रातून काश्मिरी विद्यार्थ्यांच्या परत येण्यास होत असलेल्या उशिराबद्दल जम्मू आणि काश्मिरच्या प्रशासनाशी संपर्क साधला तेव्हा, अधिकाऱ्यांनी दावा केला की आंतरराज्यीय प्रवास राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमुळे ठप्प झाल्याने हा उशिर होतो आहे. आम्ही राजस्थान प्रशासनाच्या संपर्कात आहोत, पण हा पेच सुटेपर्यंत आणखी काही काळ आम्हाला प्रतिक्षा करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांसह लोकांनी आपला क्वारंटाईनची मुदत पूर्ण केली आहे, त्यांच्या परत येण्याविषयी आम्ही शक्य ते सर्व उपाय योजत आहोत, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
हा अधिकारी पुढे म्हणाला की, जम्मू आणि काश्मिरच्या नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला आणखी काही काळ सहकार्य करावे. आम्ही आमच्याकडून सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रशासन उतावीळपणे काहीही न करता हा पेच सोडवण्याचा दावा करत आहे, तर जैसलमेर केंद्रातील काश्मिरी विद्यार्थी आणि त्यांचे काश्मिरातील कुटुंबीय, या महामारीत दडपणाखाली चिंताग्रस्त झाले आहेत.
- झुलकारनैन झुल्फी.