बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन केले होते. यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात पावती फाडली होती. परंतु, मागील ४ महिन्यांपासून कुमारस्वामींनी पावतीचे पैसे भरले नाहीत. यामुळे पैसे भरण्यासाठी पोलिसांनी कुमारस्वामींना नोटीस पाठवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिवनगर येथे १० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या कारचालकाने गाडी चालवताना मोबाईलचा वापर केला होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्वयंचलित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्वप्रकार कैद झाला होता. यावेळी कुमारस्वामींनी सरकारी गाडीऐवजी खासगी गाडी रेंज रोव्हरचा वापर केला होता. यानंतर, पोलिसांनी कुमारस्वामींना दंड भरण्यासाठी नोटीस पाठवली होती.
एक वरिष्ठ अधिकारी याप्रकरणावर बोलताना म्हणाला, नियमानुसार पावती दिल्यानंतर ७ दिवसांच्या आतमध्ये दंड भरणे आवश्यक आहे. परंतु, २ आठवडे झाल्यानंतरही दंड भरला नसल्यामुळे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. नोटीसनुसार, दंड भरण्यात आला नाहीतर वाहतुक पोलीस मुख्यमंत्र्यांची गाडी रस्त्यात अडवून दंड वसूल करेल.