हुबळी - 'काँग्रेसचे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे त्यांची सध्याचे आघाडी सरकार चालू देण्याची इच्छा नाही. आम्ही केवळ परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत. जेव्हा सरकार आपोआप पडेल, तेव्हा आम्ही काहीही करू शकतो,' असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.
सध्याचे काँग्रेस-जेडीएस राजीनामा सत्र पक्षांतर्गत असंतोष आणि दुफळीमुळे झाले आहे. 'सध्या काँग्रेसमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांवर अंतर्गत असंतोष आणि दुफळी माजली आहे. असमाधानामुळेच त्यांच्या आमदारांनी राजीनामे दिले. त्यांच्यातील काही जणांना सरकार सुरळितपणे चालू द्यायचे नाही,' असा दावा जोशी यांनी केला आहे.
दरम्यान, 'कोणीही राजीनामा देणार नाही. मी काँग्रेस आणि जेडीएसच्या सगळ्या आमदारांशी चर्चा करणार आहे,' असे कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. 'आमच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे यासाठी आम्ही राजीनामा देत आहोत. याबाबत कोणालाही दोष देणार नाही,' असेही रामलिंगा रेड्डी या आमदाराने म्हटले आहे.
शनिवारी झालेल्या राजीनामा नाट्यामुळे कर्नाटक सरकार अल्पमतात येऊ शकते. मागील वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने १०५ जागा मिळवल्या. मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र, सत्ताधारी आघाडीतील ११ आमदारांनी राजीनामा दिला आहे. यापैकी एक आमदार एच. विश्वनाथ यांनी १४ आमदारांनी राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. यातील १० आमदार मुंबईला पोहोचले आहेत. यामुळे कर्नाटकात येत्या काही दिवसांत आणखी राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यता आहे.